बाप्पा......ओढ तुझ्या आगमनाची

सप्टेंबर महिना सुरु झाला की,सगळे फक्त एकाच ठिकाणी आपले लक्ष लावून असतात बाप्पा कधी येणार आपल्या भेटीला? कधी एकदा आपल्या घरी बाप्पा विराजमान होणार? सगळे अगदी आस लावून बसलेले असतात बाप्पा तुझ्यासाठी.बाप्पा तू सुद्धा नक्कीच आम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी उत्सुक असशील ना?खरं तर हा प्रश्न तुला विचारण चुकीच आहे कारण,तू तर नेहमी आमच्याबरोबर असतोच.प्रत्येक दुःखात-संकटात आमची साथ देतोस तू.जसा एक आपला जिवलग मित्र ,आपले आई बाबा कितीही कठीण प्रसंग आला तरी आपली नेहमीच साथ देतात,आपल्याला एकट सोडत नाहीत अगदी तू ही तसाच नेहमी बरोबर असतोस.पण बाप्पा मला कधी-कधी एक प्रश्न पडतो की,तू इतक्या लोकांचं दुःख दूर करतोस मग तुला दुःख नसेल का कोणत्या ही गोष्टीच,तुझी साथ कोण देत असेल?पण बाप्पा खरंच तुझे खूप मनापासून आभार.तुझे आभार जितके मानावे तितके कमीच आहेत.आज ह्या लेखनाच्या निमित्ताने मला अस वाटतंय की,बाप्पा तू माझ्यासमोरच बसला आहेस आणि मी तुझ्याशी गप्पा मारतेय.माझ्या प्रमाणे अनेक भक्तजन,तुझे चाहते तुझी खूप आतुरतेने वाट बघतायत.अगदी लहान मुले,तरुण मुलं,मोठी माणसं,वयस्कर माणसं सगळेच तुझ्या दर्शनासाठी उत्सुक आहेत.सगळ्यानांच तुला पाहण्याची ओढ लागून राहिली आहे.जस एखाद लहान मूल आपले बाबा कामावरून घरी कधी येणार ह्याची उत्सुकतेने वाट पाहत असत तसेच अगदी सर्वजण तुझी वाट पाहतायत.आता काही थोडे दिवसच राहिले आहेत तू येण्यासाठी.सगळीकडेच उत्साहाने तुझ्या येण्याची तयारी चालू आहे.ठिकठिकाणी घरांमध्ये,मंडपांमध्ये तुझ्याच येण्याची तयारी चालू आहे.मला नेहमीच असे वाटते की,माझ्या घरी पण बाप्पाने आगमन करावं,त्याची छान सेवा करावी.बाप्पा तू नेहमीच आमचा विचार करत असतोस पण हे थोडे दिवसच असतात जिथे फक्त आणि फक्त तुझा विचारच सगळ्यांच्या मनात असतो. तुझ्या आगमनाने सगळीकडेच कसे प्रसन्न वातावरण झालेले दिसते.प्रत्येकाच्या घरात सुद्धा बाप्पा आलेले असतात म्हणून सगळे किती खुश,उत्साही असतात.तुझ्या येण्याने सगळे कुटुंब एकत्र येते.बाप्पा तू आहेसच तसा सगळ्यांना एकत्रित ठेवणारा,आनंदात ठेवणारा.बाप्पा,तुझ्याबरोबर अजून एकजण प्रत्येकाच्या घरात येतात ते म्हणजे उंदीर मामा,अगदी छान,आनंदात ते सुद्धा तुझ्या पायापाशी बसलेले असतात.उंदीर मामा खरच तुम्ही खूप नशीबवान आहात.उंदीर मामांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळाच आनंद दिसत असतो.बाप्पा,तुला सुद्धा आकार घेताना मी खूप वेळा पाहिलंय,खूप नवल वाटतं आणि वेगळं वाटतं की,ज्याने एवढ्या मोठ्या सृष्टीची रचना केली,ज्याने आम्हा सर्वजणांना घडवलं आज त्यालाच घडताना बघायला मिळतंय.बाप्पा तू जेव्हा पूर्णपणे घडतोस,तुझं सुंदर,अप्रतिम रूप तयार होत तेव्हा तुझ्या डोळ्यांकडून नजर दुसरीकडे कुठेच जात नाही.तुझ्या डोळ्यात बघताना असताना अस वाटतं की,तू सांगतोयस की मी येतोय लवकरच तुमच्या भेटीला,तुमच्याच घरातला एक सदस्य व्हायला,तुमची सगळी दुःख दूर करायला.जिथे तू आकार घेतोयस त्या ठिकाणी गेल्यावर असे वाटते की ,तुझी किती वेगळी-वेगळी रूप नजरेस पडतात पण तरीसुद्धा प्रत्येक मूर्तीमध्ये तोच एक आपलेपणा वाटतो.तुझ्या आगमनासाठी वाजवले जाणारे ढोल-ताशे,प्रत्येकाचा गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया असा कानावर पडलेला आवाज ऐकून तर अजून तुला पाहण्याची उत्सुकता वाढते.लहानपणीच्या तर बाप्पा तुझ्याशी जोडलेल्या खूपच गोड आठवणी आहेत.लहानपणी बाप्पा तुझ्यासाठी एकत्र सगळ्यांनी मिळून जमा केली वर्गणी,तू येणार म्हणून केलेली सजावट सार काही आठवत.लहानपणी आरती सुरुवातीपासून करायला मिळावी म्हणून केलेली धावपळ,ते टाळ वाजवणे,तो हातावर ठेवलेला प्रसाद मग तसच धावत-धावत प्रसाद खात दुसऱ्या घरात बाप्पाच्या आरतीला जाण,मधून-मधून वाट काढत पुढे जाऊन उभे राहणे,आरती घेणे सगळं काही आठवत.आरती करताना प्रत्येकाकडे बघून एक वेगळाच आनंद मिळतो मला नेहमीच ,कारण किती विभिन्न स्वभावाची लोक एकत्र येऊन फक्त आणि फक्त तुझं नाव घेत असतात,अगदी मंत्रमुग्ध झालेले असतात प्रत्येकजण.आजकालच्या  एवढ्या धावपळीच्या जगात,तंत्रज्ञानाच्या जगात,सुख सुविधांच्या जगात प्रत्येकजण इतका बुडाला आहे की,तो स्वतःकडे हवं तस लक्ष देत नाही पण,तुझ्या येण्याने तू प्रत्येकाला एक वेगळाच संदेश देतोस,की ह्या सर्व गोष्टींपलीकडे सुद्धा एक जग आहॆ ते उघड्या डोळ्यांनी बघायला शिका.प्रत्येकजण आजकाल कामावरून थकून भागून घरी आला की,आधी ताजेतवाने होऊन एकतर दूरदर्शन किंवा भ्रमणध्वनीचा वापर करतात.परंतु,तुझ्या येण्याने प्रत्येकजण सगळं काही विसरून फक्त तुझी आरती करायची म्हणून तयार होतो,फक्त आणि फक्त तुझाच विचार करतात.आजकाल प्रत्येक सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी तुझ्या रूपातून खूप छान सामाजिक संदेश दिले जातात.तू जेव्हा येतोस तेव्हा किती आनंदाने,उत्साहाने तुझं स्वागत केलं जात.तुझं आगमन झाल्यानंतरचे दिवस इतके पटापट निघून जातात की,काही कळतच नाही.असं वाटतं दिवस संपूच नयेत.शेवटी दिवस पटापट जातात आणि तुला निरोप देण्याचा दिवस उजाडतो.त्या दिवशी असे वाटत राहते की,बाप्पा आपल्यासाठी आले होते आणि लगेच घरी निघाले सुद्धा.खरच बाप्प्पा तुला निरोप देताना चेहऱ्यावर कितीही हसू असलं ना तरी जेव्हा तुला विसर्जन करायला पुढे नेतात त्याक्षणी पटकन डोळ्यात पाणी कस  येत काहीच कळत नाही.असंख्य डोळे फक्त तुझ्याकडेच नजर लावून असतात आणि तुला सांगत असतात की,बाप्पा नीट जावा तुमच्या घरी आणि पुढच्या वर्षी लवकर आम्हाला भेटायला परत या तोच नेहमीसारखा आनंद,प्रसन्नता घेऊन.त्या प्रत्येक व्यक्तीकडे बघितल की,अंगावर शहारा उभा राहतो.पण मग प्रत्येकाचा आवाज कानावर पडतो तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया मंगलपूर्ती मोरया,
एक-दोन-तीन-चार-गणपतीचा जयजयकार,पुढच्या वर्षी लवकर या,गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असे अनेक आवाज कानावर पडतात.त्यामुळे थोडस सावरून मग प्रत्येकजण आपापल्या घरी परततो ते पुढच्या वर्षी बाप्पांच्या आगमनाची स्वप्न घेऊन,पुढच्या वर्षीची बाप्पाची तयारीची स्वप्न घेऊन.जाता जाता फक्त एवढच सांगेन की,सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी जी गाणी लावली जातील ती फक्त हळू आवाजात लावा.कारण बाप्पांना आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे असेच वाटते कारण,ते नेहमी प्रत्येकाला सुख,आनंद देण्याचा विचार करत असतात. तर प्रत्येकाने ह्यावर विचार करावा.बाप्प्पा,माझं हे लेखन संपवता-संपवता फक्त इतकंच सांगेन की,लवकर या बाप्पा.जशी मी तुमची वाट पाहतेय आतुरतेने,उत्सुकतेने अगदी तशीच वाट प्रत्येकजण पाहतोय.🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास