माझं अंगण....

माझं अंगण हे पहाटे पहाटे पडलेल्या सोनेरी सूर्यकिरणांनी भरून गेलेलं. अंगणात वाढलेल्या प्रत्येक रोपावर हे सोनेरी सूर्यकिरण असं काही पडतं जणू ही सोनेरी किरणं त्या रोपांना कुरवाळत आहेत. शेणाने सारवलेली जमीन, तुळशी वृंदावन, कोंबड्यांचे आरवणे, अधून मधून कोकिळेचा कानावर पडणारा आवाज, तुळशी वृंदावनात लावलेल्या अगरबत्तीचा सुवास आणि सोबत जास्वंदीच्या फुलांनी सजून गेलेलं तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूची रांगोळीने सजलेली जमीन. अंगणात प्राजक्ताच्या फुलांची झालेली आरास, लहान मुलांचे अंगणात रंगलेले विविध खेळ. पावसात तर अंगण संपूर्ण पावसाच्या सरींनी भिजून जाते. मातीचा सुवास सर्वत्र दरवळतो. अंगणात उभे राहून हातावर पावसाचे थेंब झेलणे, पावसात ओलेचिंब भिजून जाणे, त्या साचलेल्या पाण्यात उड्या मारणे. अंगणातली रोपटी तर पावसामुळे अजून बहरून जातात. अंगणाची शोभा अजूनच वाढते. आजीचे जात्यावर दळण दळणे, ते काम करता करता ओवी बोलणे. आजीला मदत करत करत तिच्या ओवी ऐकणे आणि तिच्या गोष्टी ऐकणे. अंगणात उन्हाळ्यात काही सुकायला ठेवलं असेल तर दुपारी ते हळूच खाणे. रात्रीचे जेवण झाल्यावर अंगणात सर्वजण एकत्र बसून गप्पा मारणे, चंद्राचा अंगणात पडलेला उजेड, मोगऱ्याचा सर्वत्र दरवळलेला सुवास. 

तुमच्याही ह्या गावच्या घरातील अंगणाबद्दल नक्कीच काहीतरी आठवणी असतील. शहरी जीवनात व्यस्त झालेलं मन कधी ना कधीतरी ह्या आठवणींत रमत असेल. तुमच्याही ह्या अंगणाशी जोडलेल्या काही ना काही आठवणी असतीलच.

धन्यवाद!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास