भूतकाळात गुंतलेलं मन....
आपल्या मनाला का कोण जाणे परंतु, वास्तविक किंवा भविष्यातील गोष्टींचा विचार करण्यापेक्षा भूतकाळातील घडून गेलेल्या क्षणांत ते नेहमी गुंतून जातं. एखादी वाईट घटना घडली असेल तर ती का घडली, असं नाही व्हायला पाहिजे होतं, ती गोष्ट घडलीच नसती तर किती बरं झालं असतं हाच विचार आपलं मन करत असतं. एखादी व्यक्ती साथ सोडून गेली तर त्याच व्यक्तीच्या आठवणींत आपण जगत राहतो. परंतु, वर्तमानकाळात कोण आपल्या सोबत आहे, त्या व्यक्तीचं स्थान आपल्या आयुष्यात काय आहे, ती व्यक्ती आपल्याला किती प्रिय आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपलं काय स्थान आहे ह्या गोष्टींचा विचार आपण खरंच करतो का? आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या जगण्यात काही ना काही बदल घेऊन येते. प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या विचारांनी आपल्याला सुद्धा विचार करायला भाग पाडते. प्रत्येक व्यक्तीची छाप ही वेगळ्या रीतीने आपल्या आयुष्यावर पडते. एखादी व्यक्ती काही काळासाठी सोबत असते तर एखादी व्यक्ती आयुष्यभरासाठी सोबत असते. जी व्यक्ती साथ सोडून गेली तिच्या आठवणींत झुरत राहायचं की जी व्यक्ती सोबत आहे तिच्या सोबतीने आयुष्य सुंदर बनवायचं हे आपल्या हातात असतं. मान्य की, एखाद्या व्यक्तीची ओढ लागली की, ती व्यक्ती नेहमी सोबत राहावी असं वाटतं, तिच्या सहवासात आयुष्य छान सुंदर व्यतीत व्हावं असं वाटतं पण ज्या व्यक्तीला आपल्याही पेक्षा दुसरं काहीतरी महत्वाचं वाटत असेल तर अशी व्यक्ती कायमस्वरूपी आपली नाही होऊ शकत. मग अशा नात्यात जबरदस्तीेपणा सुद्धा गरजेचा नसतो. त्या व्यक्तीला त्याचवेळी जाऊ द्यावं. अशा वेळी दुःख होणं साहजिक आहे. तर मग एकांतात जाऊन रडून घ्यावं, निवांत ठिकाणी एकट्याने बसून मन मोकळं करून घ्यावं. अशा वेळी स्वतःशी संवाद साधणं खूप गरजेचं असतं, स्वतःच्या मनाला जाणून घेणं हे सुद्धा गरजेचं असतं. दुसरा दिवस सुरू करायचा तो नव्या उमेदीने. काही जखमा आयुष्यभर त्रास देतात परंतु, त्या जखमेला कायमचं तेव्हाच बरं करायचं की तिला आयुष्यभर सहन करायचं हे ही आपल्याच हातात असतं.
आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस काही ना काही नवीन आठवणी घेऊन येतो. नवीन व्यक्ती भेटतात, नवीन अनुभव मिळतात, काही व्यक्ती अगदी काही क्षणासाठी भेटतात परंतु, कधी-कधी अशा व्यक्तींशी बोलून सुद्धा छान वाटतं. त्यांच्याशी झालेली ती क्षणिक भेट नेहमी स्मरणात राहते. वास्तविक आयुष्य आणि त्यापुढे येणारं भविष्यातील आयुष्य खूप सुंदर आहे मग भूतकाळाचा विचार करत का जगत राहायचं, का नेहमी त्याच्यातच झुरत राहायचं. आहे त्या गोष्टी जिथे घडल्या आणि ज्या व्यक्तीमुळे घडल्या त्या दोघांनाही कायमचा हसत खेळत निरोप द्यायचा. जाता-जाता त्या व्यक्तीचे मनापासून आभार सुद्धा मानायचे हा. जितका काळ ती व्यक्ती सोबत होती तो आयुष्याचा काळ खूप छान गेला त्याबद्दल आणि मग नंतर जे आयुष्यात वळण घ्यायचं ते नव्या आयुष्याच्या दिशेने आणि ते पण चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेऊनच.
धन्यवाद!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा