मोडी लिपीची गोडी......

 

* ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोडी लिपी बद्दलची माहिती मी आज तुम्हा सर्व वाचकांसाठी घेऊन येते आहे. ९00 वर्षांचा वारसा लाभलेल्या ह्या मोडी लिपीबद्दल आपण माहिती जाऊन घेऊया.


१.मोडी लिपी माहिती 

                               "मोडी लिपी" ही मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे, जी महाराष्ट्र राज्यात बोलली जाणारी प्राथमिक भाषा आहे. मोडी लिपीच्या उत्पत्ती संदर्भात अनेक सिद्धांत आहेत. विसाव्या शतकापर्यंत देवनागरी लिपी बरोबरच देवस्थान लिपीच्या बाळबोध शैलीला मराठी साठी प्रमाणित लेखन प्रणाली म्हणून बढती दिली जाईपर्यंत मोडी लिपीचा वापर मराठी भाषेसाठी केला जात असे. एकविसाव्या शताब्दीचे मराठी भाषिक लोकांचे असे विचार व  मत झाले आहे की, जर मराठी भाषेची मूळ असलेली "मोडी लिपी" जर पुन्हा वापरात आणली गेली तर मराठी भाषेचा प्रभाव वाढेल.

                                "मोडी लिपी" तेराव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकाळात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नाव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बाळबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली. उर्दूप्रमाणे "मोडी लिपी" हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. मोडी लिपीत अनेक शब्दांची लघुरूपे वापरून कमीत कमी ओळीत सारांश लिहिला जातो. मोडी लिपीतील अक्षरांची वळणे गोलाकार असतात, त्यांमध्ये मराठीच्या विपरीत, काना खालून वर जातो. ह्यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते. तसेच प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. मोडी लिपीत चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणे आहेत. मोडी लिपीतील घोसदार वळणाचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला असे मानले जाते. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत आहेत.


* पुढील भागात "मोडी लिपीचा" इतिहास जाणून घेऊया.


२.मोडी लिपीचा इतिहास 

                                    "मोडी लिपीचा नमुना" - हे पत्र "सवाई माधवराव पेशवे" ह्यांनी सेनापती महादजी शिंदे ह्यांस दिनांक ३०, मार्गशीष महिना, वर्ष १७८४ रोजी लिहिले होते. मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते आहेत.


- "मोडी लिपी" ही हेमाडपंत ह्यांनी श्रीलंकेतून आणली.

- "मोडी लिपी" अशोककाळातील मौर्यी (ब्राह्मी) चाच एक प्रगत प्रकार आहे.

- "मोडी लिपी" ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिली जाते. इतर लिपींच्या तुलनेत वैशिट्यपूर्ण मानली जाते.


* पुढील भागात मोडी लिपीचा काळ, ती किती वर्ष वापरात होती ह्याबद्दल माहिती जाणून घेऊया.


३.मोडी लिपीचा काळ 

                                   "मोडी लिपी" महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात होती. सर्वात जुना उपलब्ध "मोडी लेख" इस्वी सन ११८९ मधील आहे. ते पत्र पुणे येथील "भारत इतिहास संशोधक" मंडळाच्या संग्रहात आहे. "मोडी लिपी" अल्प प्रमाणात का होईना, १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. शेवटच्या दोन - तीन शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इस्वी सन १७०० च्या सुमारास चिटणीसी वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व ह्यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रांतील "मोडी लिपी" क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.

                                    "मोडी लिपी" पेशवाई काळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे ह्यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळींतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे ह्या लेखनाचे वैशिष्ट्य. "छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ ते उत्तर पेशवाई ह्या काळांतील "मोडी" वाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.

                                    "ज्ञानेश्वरी" लिहिली जाण्याच्या काळात "मोडी संकल्पना" महाराष्ट्रात येत होती. ह्याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते. लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरु केला असावा कारण कागज हा फारसी शब्द असून कागज ह्या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही.

                                       शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरून वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. विराम चिन्हांचा वापर इंग्लिश भाषेशी ओळख झाल्यानंतरच भारतीय लिपींत सुरु झाला.


* पुढील भागात ह्या "मोडी लिपीची" वैशिष्टये जाणून घेऊया.


४. मोडी लिपीची वैशिष्टये

- मोडी लिपीचे प्रमुख वैशिष्ट्य" म्हणजे कागदाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एक सरळ शिरोरेघ आखून त्याखाली मोडी लिपीतील अक्षरे "लपेटीयुक्त" स्वरूपात अखंड लिहीत जाणे.

- अक्षरांच्या ऱ्हस्व - दीर्घ भेदाची न्यूनता, शुद्धलेखन, व्याकरण आणि शब्दतोडीचा अभाव ही वैशिष्ट्ये देखील ओघाओघाने लक्षात येतात.

- मोडी लिपीमुळे सर्व कारभार हे जलदरीत्या होत असत.

- मोडी लिपीत "र" हे अक्षर पाच प्रकारे लिहिले जाते.

- मोडी लिपीत "द" ह्या अक्षराच्या साहाय्याने "ध", "ख" आणि "ह" ही अक्षरे लिहिली जातात.

- मोडी लिपीत जे लिखाण केले जाते त्या लेखनपद्धतीला "लपेटीयुक्त लेखनपद्धती" असे म्हंटले जाते.

- इस्वी सन १९०५ मध्ये 'बेळगाव' येथून 'खबरदार' नावाचे मोडी लिपीतील वृत्तपत्र प्रकाशित झाले होते.

- मोडी लिपीच्या उपयोगितेचा विचार करून मोडी वाचनमालेची काही पाठ्यपुस्तके एकोणिसाव्या शतकात प्रकाशित झाली होती.


* पुढील भागात मोडी लिपीचे प्रकार जाणून घेऊया.


५. मोडी लिपी वर्गीकरण 

मोडी लिपीचे सहा कालखंडात वर्गीकरण केले गेले आहे.

१. आदयकालीन मोडी लिपी 

२. यादवकालीन मोडी लिपी 

३. बहामनीकालीन मोडी लिपी 

४. शिवकालीन मोडी लिपी 

५. पेशवेकालीन मोडी लिपी 

६. आंग्लकालीन मोडी लिपी 


आता आपण ह्या सर्व कालखंडांबद्दल माहिती जाणून घेऊया.

१.आदयकालीन मोडी लिपी

                                      "आदयकालीन मोडी लिपी" ही साधारणतः बाराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती.

२. यादवकालीन मोडी लिपी 

                                       'राजा रामदेवराय', 'राजा महादेवराय' आणि 'राजा हरपालदेव यादव' ह्यांच्या कालखंडात मोडी लिपीचे पुर्नजीवन झाले. तेराव्या शतकाच्या कालखंडापर्यंत ही शैली अस्तित्वात होती.

३. बहामनीकालीन मोडी लिपी 

                                          "बहामनी कालखंडात" म्हणजेच चौदाव्या ते सोळाव्या शतकाच्या कालावधीत ही शैली वापरली जात होती.

४. शिवकालीन मोडी लिपी 

                                      "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" कालखंडातील मोडी लिपीला "शिवकालीन मोडी लिपी" असे म्हंटले जाते. यादवकालात सुरु झालेला मोडी लिपीचा प्रवास शिवकालात बहरून आला. साधरणतः सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ह्याचे अस्तित्व होते.

५. पेशवेकालीन मोडी लिपी 

                                      "पेशवे" काळात "मोडी लिपी" रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवे काळात मोडी लिपीचे लिखाण बोरूने होत असे. अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ह्याचे अस्तित्व होते.

६. आंग्लकालीन मोडी लिपी 

                                        एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ह्या शैलीचे अस्तित्व होते. इंग्रजांच्या कालखंडात "मोडी लिपी" प्रामुख्याने पेनाने लिहिली जाऊ लागली. ब्रिटिशांनी छपाई यंत्राचा वापर केल्यामुळे लिपीमध्ये एकसारखेपणा आला पण तिचे सौंदर्य नष्ट झाले.

                                        वापरायला तसेच छपाईस अवघड असल्यामुळे देवनागरी (बाळबोध) लिपीचा वापर सक्तीचा केल्यामुळे मोडी लिपीचा वापर कमी झाला. "मोडी लिपी" सन १९६० पर्यंत लिखाणात अल्प प्रमाणात प्रचलित होती, तसेच प्राथमिक अभ्यासक्रमात ह्या लिपीचा समावेश होता.


* पुढील भागात मोडी लिपीत जी कागदपत्र आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.


६. मोडी लिपीतील कागदपत्रे

                                         आजही जर शिवकाळातील व पेशवाई काळातील कागपत्रांवर नजर टाकल्यास त्यातील बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच आहेत हे दिसेल. तसेच आजही खाजगी संस्थांकडे, शासकीय, निमशासकीय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, नगरपालिका येथील जुने दस्तऐवज "मोडी लिपी" मध्ये आहेत.

                                           महाराष्ट्र शासनाच्या पुरलेखागारातील पुणे पुरालेखागाराचे उदाहरण दयावयाचे झाले तर ह्याठिकाणी "पेशवे दप्तरातील" १५९० पासूनचे मोडी लिपीतील अभिलेख ठेवण्यात आले आहेत. एका लिपीतील, एका भाषेतील, एका राजवटीतील व एकाच राज्याची इतिहास सांगणारी सन १५९० ते १८५६ म्हणजेच सुमारे २५० वर्षांची "ऐतिहासिक मोडी लिपीतील कागदपत्रे" आहेत.

                                          ह्या व्यक्तिरिक्त मुंबई, पुणे, धुळे, इंदूर, ग्वाल्हेर, तंजावर, कर्नाटक, केरळ, इत्यादी अनेक जमीन महसूल विभाग ते सरकारी दफ्तरखान्यांतून व पुरलेखागारातून कोट्यावधी कागद मोडी लिपीत लिहिलेले आहेत मात्र आज अशी स्थिती की, मोडी जाणकार किंवा मोडी लिपीतील अभिलेखांचे वाचन करणारे अत्यंत अल्प असल्याने ह्या दस्तऐवजांचे वाचन होत नाही.

                                           "मोडी लिपी ही सरकारने बंद केली असली तरी, मोडी लिपीचा काळ जरी गेलेला असला तरी जुनी कागदपत्र तर आहेतच. पण ते वाचण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी "मोडी लिपी" शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कारण, भाषा, लिपी व व्यवहार ह्यांचा संबंध वेगवेगळा असला तरी मोडी लिपीचे शिक्षण घेणे हे शासकीय दफ्तरातील मोडी लिपीतील कागदपत्रे पाहता आवश्यक आहे.

                                           कारण, अशी कागदपत्रे केवळ सरकारी कचेऱ्यांतच नव्हे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात, गावोगावी देवळांत देखील उपलब्ध आहेत. गावोगावी अस्तित्वात असलेली खरेदीखत, गहाणखत, बोटखते, फारोक्तखते, करारपत्रे, दान पत्रे, वाटणी पत्रे, अभयपत्रे, मृत्यूपत्रे, जाहीरनामा, राजपत्र केवळ आपल्याला वाचता येत नाहीत पण महत्वाची आहेत. त्यात काय लिहून ठेवले आहे हे कोणाला कसे समजणार हा प्रश्न सर्वांना भेडसावणारा आहे. म्हणून आपल्याला मोडीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

                                        मोडी लिपीची भाषा मराठीच असते त्यामुळे मोडी लिपीचा कागद आपण मराठीत (देवनागरीत) लिपीत करतो त्याला "लिप्यंतर" असे म्हणतात. त्याला भाषांतर असे म्हणता येणार नाही.

                                         सामान्यतः फारशी लिपीला "पिशाच्च" लिपी म्हणतात. कारण, ती उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. परंतु, मोडी लिपीलाही पूर्वी पिशाच्च लिपी म्हणत असत. ते का म्हणतात हे तुम्हाला प्राथमिक मोडी लिपीचा अभ्यास करताना समजेलच आणि हा प्राथमिकचा अभ्यास जसजसा प्रगत कडे वळेल तसतशी मोडी लिपी तुम्हाला अधिकाधिक आवडू लागेल व तिचा अधिक अभ्यास करण्याकडे तुमचा कल आणखी वाढेल.

                                        "मोडी लिपी" ही इतिहासात डोकावण्याचा राजमार्ग आहे. लिपी वाचता येत असल्यास आपण इतिहासातील अनेक पुरावे आणि तत्कालीन परिस्थिती, खरेदी - विक्री व्यवहार, आज्ञापत्रे, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक कागदपत्रे, निश्चित समजून घेऊ शकतो. असा इतिहास शोधून काढायचा असेल तर "मोडी लिपीतील ही कागदपत्रे" वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

                                         "मोडी लिपीचे ज्ञान" जसे एक - एक टप्पा करून अवगत कराल , तशी तिची गोडी लागत जाईल. "ऐतिहासिक वारसा" लाभलेल्या ह्या "मोडी लिपीचे" शिक्षण घेणे गरजेचे आहे. ह्या लिखाणामार्फत इतकेच सांगणे की, "मोडी लिपी" येणाऱ्या काळात कुठे तरी कायमची हरवून न जाणे. जी मोठ्या प्रमाणात मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत त्यांचे वाचन करून आपला इतिहास, काही अमूल्य माहिती ही प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे.

                                                       

७. मोडी लिपीतील अक्षरे 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास