शेतकऱ्याची व्यथा
ती रात्र खूपच भयाण वाटत होती.त्यातच अधून-मधून येणारा रातकिड्यांचा आवाज,झाडांवरील सळसळणाऱ्या पानांचा आवाज त्या रात्रीची भयाणता अजूनच वाढवत होता.रामूला काही केल्या झोपच लागत नव्हती.ह्या कुशीवरून त्या कुशीवर असा त्याचा झोपण्यासाठीचा प्रयत्न चालूच होता.घराच्या छपराकडे बघत त्याच्या मनात विचार चालूच होते.जणू काही विचारांनी त्याच्या मनात कायमचा मुक्कामच केला होता.उद्याच्या दिवसाची चिंता त्याला भेडसावत होती ती म्हणजे आपले पिक ज्यासाठी इतकी मेहनत घेतली ते व्यवस्थित होईल की नाही?आणि व्यवस्थित झाले तर भाव हवा तसा मिळेल की नाही?निदान उद्या तरी कर्जमाफी बद्दल काहीतरी बातमी कळेल की नाही?पिकातून हवा तसा मोबदला मिळाला तर बायको आणि मुलांसाठी काहीतरी करण्याची त्याची इच्छा होती ती पूर्ण होईल का?दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च भागेल ना?अशा कित्येक प्रश्नांनी त्याच्या मनात थैमान घातल होत.अखेर कित्येक वेळाने आणि अथक प्रयत्नांनंतर रामूचा आणि झोपेचा मेळ साधला गेला आणि तो झोपी गेला.दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग आली ती कोण तरी घराच्या दारावर येऊन काहीतरी सांगत आहे आणि त्यातील काही शब्द त्याच्या कानावर पडले.ते थोडेसे कानावर पडलेले शब्द ऐकून समोरची अंधुक दिसणारी व्यक्ती त्याला स्पष्टपणे दिसू लागली. अगदी घाईघाईने तो उठला आणि त्या व्यक्तीकडे पूर्ण बातमी ऐकण्यासाठी गेला.तेव्हा त्याला कळलं की,यंदा पिकाचा भाव वाढवून मिळणार आहे,कर्जमाफी होण्याची सुद्धा शक्यता आहे अस वाटतंय ह्यावेळी.ही बातमी पूर्णपणे ऐकून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.काल जे प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले होते त्या सर्व प्रश्नांना आज उत्तर मिळाल होत.त्याची चिंता कधीच संपली होती.एक कटाक्ष त्याने बायको आणि मुलांवर टाकला तर त्यांचे प्रसन्न आणि खुललेले चेहरे बघून सुद्धा,त्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद बघून त्याचे डोळे पाणावले.न जाणो कितीतरी दिवस त्याला ज्या चिंता भेडसावत होत्या त्या सर्वांना एका क्षणात ऊत्तर मिळाल होत.ह्या बातमीबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वजण गावातली मंडळी एकत्र भेटणार आहेत म्हणून तुम्हाला सुद्धा बोलावलं आहे अशी बातमी तो व्यक्ती घेऊन आला होता.तो निरोप ऐकताच त्याच्यात जणू वेगळीच ऊर्जा संचारली आणि लगबगीने तो तिथे जाण्यासाठी तयारी करू लागला.लगबगीने ताजेतवाने झाल्यावर आणि न्याहारी आटोपून झाल्यावर तो तिथे जाण्यासाठी निघाला.पायात चप्पल चढवून तो तिथे जाण्यासाठी आपले पाऊल बाहेर टाकणार तोच त्याला जाणवलं की,आपल्याला जोरजोरात कोणीतरी हलवतंय आणि कानावर शब्द पडले ते म्हणजे बाबा उठा, बाबा उठा ,सकाळ झाली तुम्हाला शेतावर जायचंय ना,काय बोलताय झोपेत तुम्ही?हे ऐकून तो जागा झाला आणि समोरचे वातावरण पाहून त्याला कळलं की,आपण स्वप्न पाहत होतो.सत्य परिस्थिती आणि स्वप्नातली परिस्थिती ह्यामध्ये किती वेगळेपण आहे ह्याच विचारात तो हरवून गेला होता.अखेर तो भानावर आला आणि आपली जी सत्य परिस्थिती आहे ती स्वीकारण्यावाचून काही गत्यंतर नाही हे त्याला कळून चुकले होते.अखेर ते सर्व विचार मागे सारत तो उठला आणि रोजच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात मग्न होऊन गेला.न्याहारी आटोपून तो आपल्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडला.त्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे त्याची बायको आणि मुलं ह्याच विचाराने बघत राहिली की,निदान आजतरी ते घरी आल्यावर काही चांगली बातमी ऐकण्यास मिळेल.
ही कथा खरं सांगायचं झालं तर मला सुचलेली कथा आहे.पण एक शेतकरी माणूस आणि त्याचे कुटुंब रोज अशा कितीतरी प्रश्नांना सामोरे जात असतात,त्यांचे दैनंदिन आयुष्य,त्यांच्या व्यथा त्या मांडण्याचा फक्त मी एक प्रयत्न केलाय.आपण आपल्या दैनंदिन शहरी आयुष्यात इतके व्यस्त असतो की,आपल्या मनात हे सर्व विचार येतच नाहीत.रोज थकून भागून आपण घरी येतो आणि जे काही सुखाचे दोन घास खाऊ शकतो त्या शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आपण विचार करतच नाही.ह्याबद्दल मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुमची काही मतं असतील तर ती सुद्धा तुम्ही खाली प्रतिक्रियांमार्फत कळवू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा