सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास
सुधागड किल्ला......ही माझी दुसरी गडभ्रमंती. पहिल्या गडभ्रमंतीसाठी जशी उत्सुक होते, तशीच किंवा त्याहीपेक्षा जास्त ह्या गडभ्रमंतीसाठी खूपच उत्सुक होते.पावसाळा हा माझा आवडता ऋतू असल्यामुळे पावसातील गडभ्रमंती करण्यास मिळणार म्हणून खूप खूष होते. निसर्ग सौंदर्याचा जवळून आस्वाद घेणार होते. खूप उत्सुकतेने त्या दिवसाची वाट पाहत होते. अखेर तो दिवस उजाडला आणि ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी एकत्र भेटलो. त्यानंतर मग आमचा सुधागडच्या दिशेने प्रवास सुरु झाला.मनाला एक वेगळाच असा आनंद होत होता.त्या ठिकाणी पोहोचण्याची खूप उत्सुकता लागून राहिली होती.थोड्यावेळाच्या प्रवासानंतर एका ठिकाणी सकाळची न्याहारी करण्यासाठी थांबलो. त्या ठिकाणी मस्त गरमागरम वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला आणि मग पुढच्या प्रवासाला रवाना झालो.त्यानंतर गाडीत गप्पा, मजा-मस्ती करत थोड्यावेळाने गडाच्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही त्याठिकाणी पोहोचलो आणि पाऊस सुरू झाला म्हणून प्रत्येकाने आपापले रेनकोट घातले. 
त्यानंतर मग ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने आपली ओळख करुन दिली आणि गडाबद्दल थोडक्यात माहिती घेऊन गड चढण्याच्या दिशेने रवाना झालो. गड चढताना पाऊस सलग चालू असल्यामुळे काही ठिकाणी भीती वाटत होती,पण सगळ्यांनी दिलेल्या धीरामुळे गड व्यवस्थित चढू शकले.गड चढताना खूपच आवडलेली गोष्ट म्हणजे गार वारा, कुठूनतरी कानावर पडणारा धबधब्याचा आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाटेतील वाहते पाणी, लाल मातीचा सुगंध, वार्यावर डोलणारी झाडे-झुडपे, दाट धुके. हे सगळे वातावरण मनाला खूप आनंद देणारे होते. दोन तासांच्या वाटचालीनंतर आम्ही गडावर पोहोचलो. गडावर पोहोचताच जे अनोखे दृश्य नजरेस पडले ते खरंच सुखद असा धक्का देणारे होते.सर्वत्र दाट धुके पसरले होते,जसे एक मूल आपल्या आईचा कुशीत सामावून जाते,अगदी तसेच सर्व डोंगर धुक्याच्या कुशीत आनंदाने सामावून गेले होते. त्या दृश्याचे वर्णन जितके करावे तितके कमीच आहे.त्यानंतर पुढे मग गडाच्या विविध ठिकाणांची माहिती घेत-घेत आमचा प्रवास चालू होता.गडभ्रमंती झाल्यावर वाड्याच्या ठिकाणी सगळे जण भोजनाचा आस्वाद घेण्यास बसलो. खूप उशीरही झाला होता आणि पावसात भिजलेले होतो त्यामुळे प्रत्येकजण पटापट जेवायला बसलो.मस्त आणि स्वादिष्ट असा गरमागरम खिचडीचा बेत होता.छान असे केळीच्या पानात वाढलेले जेवण,बरोबर लोणचं. खरंच खूप उत्तम मेजवानी होती. शेवटी चुलीवरच्या जेवणाची चव काही वेगळीच असते.सगळ्यांचे जेवण झाल्यावर प्रत्येकजण आपापले सामान घेऊन मग आम्ही गड उतरण्याच्या दिशेने रवाना झालो.गड उतरताना पावसाने विश्रांती घेतली होती परंतु,थोडा चिखल असल्यामुळे,वाट निसरडी असल्यामुळे प्रत्येकजण काळजीपूर्वक उतरत होते. उतरताना सुद्धा मध्ये काही ठिकाणी निसरडी वाट असल्यामुळे भीती वाटत होती,पण प्रत्येकाच्या मार्गदर्शनाने,एकमेकांच्या मदतीने आम्ही गड उतरलो. गड उतरल्यावर मग सगळे जण आपापले सामान नीट करून,थोडे ताजेतवाने होऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.परतीच्या प्रवासात थोडावेळ गप्पा झाल्या,काही जणांनी आपला गडभ्रमंतीचा अनुभव सांगितला. त्यानंतर मग थोड्यावेळाने आम्ही झोपी गेलो.शेवटी मग अडीच-तीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही दादरला पोहोचलो.तर असा हा खूप आनंद देणारा,सुखद,निसर्गरमणीय असा हा आमचा सुधागड किल्ल्याचा प्रवास होता.


सुधागड चे खूप छान शब्दात वर्णन केले आहेस👌
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाअप्रतिम वर्णन, पुढील गडभ्रमंतीसाठी शुभेच्छा !
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा