किल्ला राजगड......खूप अविस्मरणीय गडभ्रमंती
किल्ला राजगड.......ही माझी आतापर्यंतची तिसरी गडभ्रमंती.आधीच्या दोन्ही गडभ्रमंतीप्रमाणे ही गडभ्रमंती सुद्धा तितकीच खूप रोमांचक,खूप मनाला आनंद देणारी होती.पण हा गड फिरून हे मला नक्कीच कळलं की,हे जे सर्व गड आहेत ते म्हणजे आपल्या सर्वांना लाभलेली एक सुंदर अशी भेटवस्तू आहे.मी जो राजगड वर अनुभव घेतला तोच मी माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतेय.राजगड ला जाण्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी एकत्र जमलो.त्यानंतर सगळे सामान एकत्र ठेऊन आमचा राजगडच्या दिशेने प्रवास सुरु झाला.प्रवास जसा सुरु झाला तसा मनातून खूप आनंद होत होता की कधी एकदा त्या ठिकाणी पोहोचतेय.खरं तर का कोण जाणे पण राजगडच्या बाबतीत मी खूपच उत्सुक होते.खरं तर प्रवास जेव्हा सुरु झाला तेव्हाच मी राजगडपाशी पोहोचले होते फक्त शरीराने पोहोचण्याची बाकी होते.प्रवासात नेहमीप्रमाणे सगळ्यांची मजा-मस्ती चालू होती,गप्पा-गोष्टी चालू होत्या,गाणी चालू होती.थोड्यावेळाने मग गाडीमध्ये संपूर्ण शांतता पसरली कारण सगळेच झोपी गेले.जशी मी उत्सुक होते ह्या गडभ्रमंतीसाठी अगदी तसेच प्रत्येकजण उत्सुक होते.शेवटी ती उत्सुकता संपली आणि आम्ही पहाटे साडेपाचच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी गुंजवणे गाव आहे त्याठिकाणी पोहोचलो.त्याठिकाणी पोहोचलो तेव्हा छान गार,थंड हवा सुटली होती अस वाटत होत की,ती आम्हा सर्वजणांच जणू काही स्वागतच करत होती.हवा खूपच थंड असल्या कारणाने गाडीतून जास्त कोणी बाहेर उतरलच नाही.आम्ही जेव्हा त्याठिकाणी पोहोचलो तेव्हा त्याठिकाणी सर्वत्र अंधारच होता.पण खूप छान वातावरण होत.मग तिथेच एका ठिकाणी न्याहारीची सोय केली होती.न्याहारीसाठी थोडा वेळ असल्या कारणाने आम्ही आधी सर्वजण ताजेतवाने झालो. ताजेतवाने होईपर्यंत बाहेर उजाडलं होत.आमच स्वागत करणाऱ्या त्या मिट्ट अंधाराची जागा आता छान प्रसन्न करणाऱ्या सूर्याने घेतली होती.ताजेतवाने झाल्यावर मग जिथे न्याहारीची सोय केली होती त्याठिकाणी चूल पेटली होती तिथेच सर्वजण आळीपाळीने ऊब घेण्यासाठी बसत होते.थंडीच इतकी होती की,ती पेटलेली चूलच सगळ्यांना मायेची ऊब देत होती असे म्हंटले तरी चालेल.शेवटी थोड्यावेळाने मग न्याहारीसाठी आम्ही गेलो.छान गरमागरम मेदू वडा,इडली-सांबार चटणीचा बेत होता.त्याचा आस्वाद घेतल्यावर मग चहाचा आस्वाद घेतला.छान थंडगार वातावरणात गरमागरम न्याहारी आणि त्यात अजून भर म्हणजे गरमागरम चहा मिळणे म्हणजे सुखच.परंतु आम्ही ज्याठिकाणी बसून न्याहारी करत होतो ते घरच होते खरं तर.त्या घराची रचना खूप आवडली होती मला.ठिकठिकाणी राजगड किल्ल्यावरील जी ठिकाण आहेत त्या ठिकाणांची चित्र ,त्याबद्दल थोडक्यात माहिती लिहिली होती,भिंतीला तलवारी होत्या.खूप छान रचना केली गेली होती त्या घराची.त्यानंतर मग न्याहारी उरकून आम्ही सर्वजण नेहमीप्रमणे एकमेकांची ओळख करून घेण्यासाठी एकत्र जमलो.एकमेकांची ओळख करून झाल्यावर आम्ही काही योगाचे प्रकार केले.आमच्यासोबत एक सदस्य होते खरं तर त्यांचीच ही उत्तम कल्पना होती.मग शेवटी आम्ही गड चढण्याच्या दिशेने रवाना झालो.गड चढताना प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वाटा आमची साथ देत होत्या.कुठे पायवाट होती,तर कुठे दगडी वाट.अखेर अशा सगळ्या वाटा पार करत,अधून-मधून विश्रांती घेत दीड-दोन तासात आम्ही गडावर पोहोचलो.मध्ये एक अशी जागा होती की त्याठिकाणी चढताना खूप भीती वाटत होती.मनात थोडावेळ विचार सुद्धा आला की,मी ही जागा पार करू शकेन का?पण काय माहिती कसे अचानक मनाशी ठरवले आणि एक वेगळेच बळ संचारले संपूर्ण शरीरात आणि शरभ ऐड्वेन्चरच्या सदस्यांनी केलेली मदत त्यामुळे ती जागा सहजपणे पार करू शकले.शेवटी मग गडावर पोहोचल्यावर पद्मावती मंदिराच्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी आपापले सामान ठेवले आणि तिथेच थोडावेळ विश्रांती घेतली.तिथेच मंदिराच्या एका बाजूला पाण्याचे टाके होते.ते पाणी खरंच अमृतच होते. आमची जेवणाची सोय बाकी असल्या कारणाने आम्ही मग बालेकिल्ल्याचे दृश्य बघण्यासाठी मार्गस्थ झालो.बालेकिल्ल्याचा रस्ता सुद्धा कठीण होता पण बाजूला चढण्यासाठी नीट व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे इतके कठीण वाटले नाही. त्यानंतर मग बालेकिल्ला बघून झाल्यावर तिथेच थोडावेळ विश्रांती घेतली आणि तिथले सुंदर क्षण प्रत्येकाने फोटोत साठवून घेतले. त्यानंतर मग सर्वजण खूप भुकेलेले होते म्हणून मग सगळ्यांनी जेवणाचा अगदी मनापासून आस्वाद घेतला.जेवण आटोपल्यानंतर तिथेच थोडावेळ विश्रांती घेऊन मग सुवेळा माची बघण्यासाठी निघालो. सुवेळा माचीच्या दिशेने जाताना मध्ये जी पायवाट होती ती वाट सुध्दा खूपच सुंदर होती.वाटेच्या आजूबाजूला असणारी गवत,झाडे-झुडपे ह्यांचा होणारा स्पर्श अंगावर रोमांच उभा करत होता. सुवेळा माचीच्या परतीच्या प्रवासाच्यावेळी सुर्यास्ताची वेळ झाली होती.थोडा अंधार व्हायला सुरुवात झाली होती परंतु सुर्यास्ताचे जे अप्रतिम दृश्य होते ते अस शब्दात नाही सांगू शकत.आता त्याबद्दल लिहिताना ते सुंदर दृश्य परत नजरेसमोरून गेले.तिथून मग आल्यावर आम्ही ताजेतवाने झालो आणि मंदिराच्या ठिकाणीच थोडावेळ विश्रांती घेतली.काहीजण मंदिराच्या दिशेने पुढे एका ठिकाणी तंबूची सोय करण्यास गेले.थोड्यावेळाने तंबूची सोय झाल्यावर मग सर्वांनी आपापले सामान घेतले आणि त्या दिशेने रवाना झालो.झोपण्यासाठी अजून अवकाश होता आणि जेवण सुध्दा बाकी होते म्हणून मग आम्ही गप्पा मारत बसलो.थोड्यावेळाने मग आम्ही जेवणाचा आस्वाद घेण्यास बसलो.छान गार वारा सुटला होता आणि चंद्राचा उजेड,मध्येच कुठेतरी आकाशात दिसणार्या चांदण्या खूप छान वातावरण होत.आजूबाजूला आमच्यासारखीच बरीच लोक गडभ्रमंतीसाठी आली होती.काही वेळानंतर जेवण आटोपल्यावर मग काहीजण शेकोटीची व्यवस्था करण्यात गुंग झाले.आम्हाला ज्यांनी जेवण वाढले त्या काकांनी स्वतः जाऊन लाकूड तोडून आणून आम्हाला दिली.शेकोटी पेटल्यावर मग आम्ही सर्वजण तिथे गोलाकार बसलो. मग गप्पांना सुरूवात झाली.शेकोटीची ती मायेची ऊब ,भुतांच्या गोष्टी,काही गमतीदार गोष्टी,आणि छान जुनी गाणी. खूप छान वातावरण तयार झाले होते.कधी दीड-दोन तास गप्पांमध्ये गेले काही कळलच नाही. त्यानंतर मग सकाळी लवकर उठायचे होते म्हणून सर्वजण झोपी गेलो.सकाळी डोळे उघडले तेव्हा छान पक्ष्यांचे आवाज कानावर पडत होते.छान गार वारा सुटला होता. तंबुतून बाहेर पडल्यावर जे दृश्य नजरेस पडले त्याच्यावरून नजरच कुठे जात नव्हती.सूर्योदय,गार वारा,सूर्यामुळे आकाशात तयार झालेल्या त्या वेगळ्या छटा,अस वाटत होत की,ढग सूर्यप्रकाशांची चादर अंगावर ओढून झोपी गेले आहेत.कितीतरी वेळ त्याच दृश्याचा आनंद घ्यावेसे वाटत होते. मग आम्ही सर्वजण ताजेतवाने होऊन,आपापले सामान घेऊन न्याहारी करण्यासाठी पद्मावती मंदिराच्या दिशेने गेलो.छान असा कांदे पोहे आणि चहाचा बेत होता.न्याहारी आटोपल्यावर मग आम्ही संजीवनी माची बघण्याच्या दिशेने मार्गस्थ झालो.संजीवनी माचीच्या दिशेने जाताना सुद्धा पायवाट होती.झाड-झुडपे,गवतांमधून वाट काढत काढत आमचा संजीवनी माचीच्या दिशेने प्रवास चालू होता.संजीवनी माचीच्या दिशेने जाताना सुद्धा मध्ये आकाशाकडे नजर जात होती. ढग कुठेतरी सूर्यप्रकाशाच्या चादरीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते असे वाटत होते.संजीवनी माचीकडे पोहोचताच तिथे थोडावेळ विश्रांतीस बसलो आणि राजगडावरील शेवटच्या ठिकाणाचे काही सुंदर क्षण फोटो मध्ये साठवून घेतले.मग थोड्यावेळाने परत पद्मावती मंदिराच्या ठिकाणी येऊन अर्धा तास तिथेच विश्रांती घेऊन मग आपापले सामान घेऊन आम्ही सर्वजण पाली दरवाजाच्या मार्गाने गड उतरण्याच्या दिशेने रवाना झालो.पाली दरवाजाच्या इथे सुद्धा काही आठवणी फोटो मध्ये कैद करून मग गड उतरायला सुरुवात केली.गड उतरताना वाट सोप्पी होती परंतु काही ठिकाणी मध्ये मध्ये निसरडी वाट होती त्याकारणाने थोडे मध्ये घसरायला होत होते परंतु सोबतच्या सदस्यांमुळे,त्यांच्या मार्गदर्शनामुळे गड उतरण्यास खूपच सोप्पे झाले.शेवटी मग मध्ये काही ठिकाणी विश्रांती घेत,गप्पा मारत गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.गडाच्या पायथ्याशी एका ठिकाणी पुढेच जेवणाची सोय केली होती.मग सर्वजण ताजेतवाने होऊन जेवणाचा आस्वाद घेण्यास गेलो.जेवण आटोपल्यावर मग थोड्यावेळाने परत सर्व सामान नीट एकत्र करून परतीच्या प्रवासाला निघालो.निघालो तेव्हा थकवा जाणवत होता पण तरी सुद्धा सगळ्यांचीच मजा-मस्ती चालू होती,गप्पा चालू होत्या,त्यात काही जुनी गाणी अजून त्या क्षणांचा आनंद द्विगुणित करत होती.थोड्यावेळाने मग सर्वजण झोपी गेले.शेवटी मग काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही मुंबईला पोहोचलो आणि त्यानंतर प्रत्येकाने आपापले सामान घेतले आणि प्रत्येकजण आपापल्या दिशेने राजगडाच्या ऐतिहासिक,अप्रतिम,सुखद,अविस्मरणीय आठवणींचा खजिना घेऊन रवाना झाले.तर अशी होती राजगडची गडभ्रमंती.शेवटी एवढच म्हणणं आहे की,सर्वजण म्हणतात की मृत्यूनंतर आपण स्वर्गात जातो पण ती तर दूरची गोष्ट आहे परंतु जर जिवंतपणी स्वर्ग अनुभवायचा असेल तर राजगडची गडभ्रमंती नक्की करा.आणि परत एकदा शरभ ऍडवेंचर्सचे खरंच मनापासून खूप-खूप आभार. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice..🙏
उत्तर द्याहटवाTysm
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाkhup chan blog lihilays..saglya goshti trek mdhlya agdi barkaine lihilays.. purn trek dolya samorun gela...
उत्तर द्याहटवा