दिवाळी.....आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा सण

दिवाळीचा सण........ह्या सणाबद्दल दरवर्षीच खूप उत्सुकता असते.जसे गणपतीच्या सणाला सगळे उत्सुक असतात अगदी तसेच प्रत्येकजण ह्या सणाला सुद्धा उत्सुक असतात.गणपती बाप्पा जसे आनंद घेऊन घरात येतात,सर्वांना एकत्र आणतात अगदी तसच हा सण सुद्धा प्रत्येकाच्या घरात आनंद आणतो,भरभराट आणतो.दिवाळीशी माझ्या  खूप काही आठवणी जोडलेल्या आहेत त्याच सर्व मी ह्यामध्ये लिहिणार आहे.तुम्ही सर्वजण सुद्धा नक्की त्या आठवणींमध्ये स्वतःला कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न कराल.माझ्या मते, सर्वात जास्त दिवाळीची उत्सुकता असते ती म्हणजे बालपणीच.बालपणी जो दिवाळीचा मनमुराद आनंद लुटता येतो तो कुठेच मिळू शकत नाही.माझं बालपण गेलं ते म्हणजे पोलीस वसाहतीत.आमच्या इमारतीत एका माळ्यावर बारा खोल्या होत्या.त्याठिकाणी फराळ करण्यात तर एक वेगळीच मजा असायची.मोठी माणस फराळ करायची आणि आम्ही फक्त बसून त्या क्षणांची मजा घ्यायचो.खरंच त्या दिवसांची मजाच काही वेगळी होती.आता लिहिताना सुद्धा ते दिवस डोळ्यासमोरून गेले.दिवाळी म्हणजे फराळ तर असतोच पण अजून काही गोष्टी म्हणजे दिवाळीची खरेदी,फटाके,रांगोळी,कंदील,पणत्या.बालपणी ते आई-वडिलांचा हात धरून खरेदीला जाण त्यांच्या आवडीचे कपडे घेणं सगळं काही खूप छान होत.आता जे आपण कपडे घेतो त्यामध्ये त्या बालपणीच्या आई वडिलांच्या आवडीने घेतलेल्या कपड्यांची मजाच नाही आहे.दिवाळीची पहिली उटण्याची प्रसन्न करणारी अंघोळ,अभ्यंगस्नान ,तो मोती साबणाचा सुवास,नवीन कपडे सगळं काही खूप आनंद देणार होत.पहाटे उठून लवकर केलेली तयारी,आईच्या हातचा मायेचा फराळ,नंतर मग फटाके.माझा दिवाळीचा आवडता भाग म्हणजे दारात पणत्या लावणे,प्रत्येकाच्या घरी जाऊन फराळ देणे,दिवाळीच्या शुभेच्छा देणे,प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यात सुद्धा एक वेगळीच मजा यायची.जसे मोठे होत जातो तसे सण साजरा करण्याची पद्धत बदलत जाते असे मला वाटते.आजकाल सगळे दिवाळीच्या निमित्ताने एकत्र भेटतात खरे.परंतु,आजकालच्या तंत्रज्ञानाच्या जगात सर्वजण तिथेच जास्त व्यस्त असतात.तंत्रज्ञानामुळे माणसं जोडली जातात पण त्याची मजा आधीच्या त्या प्रत्येकाला समोर भेटून,आलिंगन देऊन शुभेच्छा देण्यात नाही आहे.आजकालच्या नोकरीच्या,धावपळीच्या जगात सुद्धा आपण आनंदाने दिवाळी साजरी करतो ती म्हणजे नोकरीच्या ठिकाणीच.बोनस झाला म्हणजे प्रत्येकजण अजून आनंदी होतो पण बालपणी आई-वडिलांनी दिलेली काही भेटवस्तू त्यामध्ये जी मजा आहे,समाधान आहे त्याची सर कशालाच नाही.माझं म्हणणं फक्त एवढच आहे की,आजकालच्या धावपळीच्या जगात थोडावेळसाठी त्या भ्रमणध्वनी,तंत्रज्ञानाच्या सुखसोयी पासून बाजूला राहून दिवाळी आपल्या माणसांसोबत साजरी करा.नक्कीच आपल्याला सुद्धा आपले बालपण आठवेल.त्या आठवणींमध्ये हरवून जा आणि मनापासून अगदी लहान,अल्लड मुलाप्रमाणे दिवाळी साजरी करा बघा नक्कीच एक वेगळा आनंद मिळेल,एक समाधान मिळेल.आणि आपल्या आणि दुसऱ्याच्या जीवाला जपून दिवाळी आनंदात,उत्साहात साजरी करा.जाता-जाता फक्त दोन ओळींमध्ये दिवाळीच वर्णन करू इच्छिते.
                                                दिवाळी आली प्रत्येकाच्या घरी घेऊनी आनंदाच्या सरी,
                                     उटण्याचे अभ्यंगस्नान आणि मोती साबणाचा सुवास मनास प्रसन्न करी,
                                                           सजली रांगोळी आणि सजली तोरणे दारी,
                           पणतीच तेज आणि कंदिलाचा लक्ख प्रकाश सर्वांचे स्वागत करण्याची करतायत तयारी,
                                         मिठाईने आणि फराळाने भरलेले ताट सुद्धा करतायत स्वागताची तयारी.
             अशी ही दिवाळी सर्वाना आनंदाची सुखसमृद्धीची,भरभराटीची जाउंदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास