प्रबळगड-रात्रीची अविस्मरणीय गडभ्रमंती

माझी ही आतापर्यंतची चौथी गडभ्रमंती.मी जशी प्रत्येक गडभ्रमंतीसाठी उत्सुक असते अगदी तशीच ह्या गडभ्रमंतीसाठी सुद्धा खूप उत्सुक होते कारण ही गडभ्रमंती थोडी वेगळी होती.थोडी वेगळी ह्या कारणासाठी की ही माझी पहिलीच रात्रीची गडभ्रमंती होती.आयुष्यात प्रथमच रात्रीच्या गडभ्रमंतीचा अनुभव घेणार होते.अखेर ती उत्सुकता संपली आणि तो दिवस आला आणि आमचा प्रवास सुरु झाला प्रबळगडच्या दिशेने.ह्या वेळचा प्रवास आमचा लोकलने होता.दादर-कुर्ला-पनवेल असा आमचा लोकलचा जवळपास दीड तासाचा प्रवास होता.जस जसे पनवेल स्थानक जवळ येत होते तशी थंडी जाणवायला लागली होती.अखेर पनवेल स्थानकावर उतरलो. काहीजण आधीच त्याठिकाणी पोहोचले होते.नंतर मग काहीजण यायचे बाकी होते म्हणून मग आम्ही त्याच ठिकाणी वाट बघत थांबलो.थोड्यावेळाने आम्ही सर्वजण एकत्र जमलो आणि मग प्रत्येकजण आले आहेत की नाही ह्या गोष्टीची तपासणी करून मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी रवाना झालो.आमचा पुढील प्रवास हा तेथील लोकल वाहतुकीने सुरु झाला.त्या अर्ध्या तासाच्या प्रवासात सुद्धा अधून मधून थंडी तिची जाणीव करून देत होती.अखेर अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही गडाच्या पायथ्याशी ठाकूरवाडी जे गाव आहे त्या ठिकाणी पोहोचलो.तिथून मग गडाविषयी थोडक्यात माहिती घेऊन आम्ही प्रबळगडच्या दिशेने रवाना झालो.गड चढताना खूप वेगळाच अनुभव येत होता.आजूबाजूने दाट झाडी,मिट्ट काळोख,झाडींच्या मध्ये पायवाट,थंड वातावरण,अधून-मधून येणारा रातकिड्यांचा आवाज,अजून सुंदर म्हणजे आकाशात टिमटिमणाऱ्या चांदण्या,मधूनच दिसणारा अर्धा चंद्र सर्व काही मनाला सुखावणार होत.टॉर्चच्या उजेडात आमचा प्रवास चालू होता.अधून मधून विश्रांती घेत-घेत,गप्पा मारत आमचा प्रवास चालू होता.गडाच्या अर्ध्यापर्यंत पोहोचल्यावर जेव्हा विश्रांतीसाठी थांबलो तेव्हा तिथून जे गावचे अप्रतिम दृश्य दिसत होते जणू काही ते गाव डोंगरांच्या कुशीत सामावून गेले होते.अखेर दीड तासानंतर आम्ही प्रबळमाचीच्या इथे पोहोचलो.त्याठिकाणीच आमची तंबूमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती.तिथे पोहोचल्यानंतर प्रथम सर्वांना आपापल्या तंबूची सोय करून देण्यात आली आणि त्यानंतर थोडे ताजेतवाने होऊन मग शेकोटी ज्याठिकणी केली होती त्याठिकाणी आम्ही सर्वजण गोलाकार बसलो.छान मनाला आनंद देणारे वातावरण होते.थंडगार हवा,वरून माचीवरून दिसणारे निसर्गाचे अप्रतिम दृश्य,त्यातच शेकोटीची मायेची ऊब  सर्व काही सुखावणार होत.शेकोटीच्या ठिकाणी काहीजण आपले आधीच्या गडभ्रमंतीचे अनुभव सांगत होते,तर काहीजण भुतांच्या गोष्टी,तर मध्येच मजा-मस्ती चालू होती.आकाशाकडे नजर गेली की,असे वाटत होते की आकाश चांदण्यांनी सजून गेले होते.थोडावेळ गप्पा झाल्यावर आम्ही तंबूमध्ये विश्रांतीसाठी गेलो.तर काहीजण बाहेरच आपल्या गप्पांमध्ये दंग झाले होते.तंबूमध्ये गेल्यावर सुद्धा झोप येत नसल्या कारणाने थोडावेळ जागेच होतो.परंतु,सकाळी लवकर उठायचे होते त्या कारणामुळे आम्ही सर्वजण झोपी गेलो.सकाळी जाग  आली ती सुद्धा गार सुटलेल्या वाऱ्यामुळे.तंबूमध्ये असून सुद्धा गार वारा इतका जाणवत होता की,जणू काही तो आम्हाला उठविण्याचा प्रयत्न करत होता.अखेर थोड्यावेळाने तंबूतून बाहेर आल्यावर समोर जे दृश्य नजरेस पडले ते निसर्ग किती अप्रतिम,सुंदर आहे ह्याचे उत्तम उदाहरण होते.छान सुटलेला गार वारा,त्या वाऱ्यावर डोलणारी झाडे-झुडपे,पक्ष्यांचे कानावर पडणारे आवाज.थोड्यावेळाने मग आम्ही सर्वजण ताजेतवाने होऊन न्याहारीची सोय ज्याठिकाणी केली होती त्याठिकाणी गेलो.छान गरमागरम कांदे पोहे आणि गरम वाफाळता चहा.त्या थंडीच्या वातावरणात पोह्यांचा आणि चहाचा आस्वाद काही वेगळाच होता.शेवटी न्याहारी झाल्यावर मग आम्ही तंबूची ज्याठिकाणी सोय केली होती त्याठिकाणी एकमेकांची ओळख करून घेण्यासाठी एकत्र जमलो.एकमेकांची ओळख करून झाल्यावर मग आम्ही तिथेच काही आठवणी कॅमेरा मध्ये साठवून घेतल्या आणि पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो.पुढची वाट थोडी कठीण आणि खडकाळ होती.परंतु,काहीजणांच्या उत्तम मार्गदर्शनाने आणि मजा-मस्ती चालू असल्या कारणाने एवढे काही जाणवले नाही.गड चढताना एक गोष्ट खूप कौतुकास्पद वाटली ती म्हणजे एक सहा वर्षांचा मुलगा गडभ्रमंतीसाठी आला होता.त्याला बघून अजून हिंमत मिळाली आणि आत्मविश्वास बळावला.खरंच त्या मुलाचे तर कौतुक आहेच पण त्या मुलाच्या पालकांना सुद्धा नमस्कार.अखेर मध्ये विश्रांती घेत घेत आम्ही एक-दीड तासात गडावर पोहोचलो.गडावर पोहोचताच तिथे एका ठिकाणी झोपडी होती त्याठिकाणी लिंबू-पाणी,खाण्याची सोय होती.त्या झोपडीच्या आजूबाजूला झाडाला बांधलेले झोपाळे होते.ते बघून लहानपणीची आठवण झाली.वरती पोहोचल्यावर मग आम्ही तिथेच झाडांच्या सावलीत थोडावेळ विश्रांतीस बसलो.थोडावेळ विश्रांती घेऊन मग आम्ही गडावरील दोन ठिकाणं बघण्यासाठी रवाना झालो.पहिलं ठिकाण आम्ही बघण्यासाठी गेलो ते म्हणजे कलावंतीण दुर्ग.त्याठिकाणी पोहोचण्यासाठी फक्त पंधरा मिनिटे लागली असतील.त्याठिकाणी जाणारा मार्ग म्हणजे दाट झाडा-झुडपांनी सजून गेला होता आणि मधून पायवाट.तिथे पोहोचल्यावर कलावंतीण दुर्ग आणि निसर्गाचे जे दृश्य होते त्याचे वर्णन शब्दात खरंच मांडता येणं कठीण आहे.ते दृश्य तिथे जाऊन बघण्यात एक वेगळीच मजा आहे.मेहनतीचं फळ काय असत हे ते दृश्य बघितल्यावर कळलं.ते दृश्य नजरेस पडताच अंगातला सर्व थकवा निघून गेला.त्याठिकाणी सुद्धा काही सुंदर आठवणी छायाचित्रांमध्ये साठवून मग आम्ही दुसरे ठिकाण म्हणजे काळा बुरुज बघण्याच्या दिशेने रवाना झालो.काळा बुरुजच्या इथला मार्ग सुद्धा दाट झाडा-झुडपांनी वेढलेला होता. त्या झाडा-झुडपांमधून सूर्याची किरणं डोकावत होती.काळा बुरुज ह्या ठिकाणी पोहोचण्याआधी वाटेत एका ठिकाणी गणेश मंदिर,आणि त्याच्या पुढेच काही गडाचे अवशेष सुद्धा आढळून आले.अखेर काळा बुरुजच्या इथे काही वेळाने पोहोचलो आणि तिथेच आम्ही सर्वजण विश्रांतीसाठी बसलो.तिथे सुद्धा थोडावेळ गप्पा,मजा-मस्ती चालू होती.थोडावेळ विश्रांती घेऊन मग आम्ही गड उतरण्याच्या दिशेने रवाना झालो.उतरताना वाट थोडी कठीण वाटत होती,भीती सुद्धा वाटत होती.परंतु,उतरताना मजा-मस्ती चालूच होती आणि अधून मधून विश्रांती घेत चालत होतो त्यामुळे नंतर इतके काही वाटले नाही.आणि माझे आवडते युट्युबर जीवन कदम ह्यांचे एक वाक्य आठवले ते म्हणजे नेहमी आपल्यावर विश्वास ठेवायचा.त्यामुळे अजून हिंमत मिळाली.अखेर काही वेळाने आम्ही प्रबळमाचीच्या ठिकाणी पोहोचलो.तिथेच आमच्या दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती.प्रथम आम्ही सर्वजण ताजेतवाने झालो आणि मग जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी गेलो.छान गरमागरम पिठलं-भाकरी,फ्लॉवरच्या भाजीचा बेत होता.शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवणाची सोय होती.अखेर जेवण आटोपल्यावर थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही गडाच्या पायथ्याशी जाण्यास रवाना झालो.गड उतरण्यास जेव्हा सुरुवात केली तेव्हा सूर्य मावळतीस जाण्यास सुरुवात झाली होती.तिथेच शेवटच्या काही आठवणी छायाचित्रांमध्ये साठवून मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी रवाना झालो.जसे-जसे आम्ही खाली उतरत होतो अगदी तसेच सूर्य सुद्धा हळू-हळू डोंगरांच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करत होता.आम्ही अर्ध्या वाटेत पोहोचलो तेव्हा उजेडाची जागा मिट्ट काळोखाने घेतली होती.अखेर जवळपास एक-दीड तासात मध्ये थोडावेळ विश्रांती घेत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.तिथे पोहोचल्यावर मग पुन्हा स्थानिक वाहतुकीने आमचा पनवेल स्थानकाच्या दिशेने प्रवास सुरु झाला.थकवा जाणवत असल्या कारणाने काहीजण झोपी गेले.काही वेळातच आम्ही सर्वजण पनवेल स्थानकाजवळ पोहोचलो.आणि मग तिथून आमचा पुढील लोकलचा प्रवास सुरु झाला.एक-दीड तासात मग आम्ही सर्वजण दादरला पोहोचलो आणि तिथून मग सगळे सुंदर गडभ्रमंतीचा अनुभव,काही अविस्मरणीय आठवणी घेऊन आपापल्या दिशेने रवाना झाले.तर अशी खूप गमती-जमतींनी भरलेली,खूप अप्रतिम आठवणींच्या खजिन्यांनी भरलेली ,माझी पहिलीच रात्रीची गडभ्रमंती यशस्वीरीत्या पूर्ण झाली.जाता-जाता इतकंच सांगावस वाटतं की,निसर्ग एका वेगळया रूपात अनुभवायचा असेल,त्याचा आनंद घ्यायचा असेल तर ही प्रबळगडाची रात्रीची गडभ्रमंती नक्की करा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास