आनंदी गोपाळ...... एक उत्तम चित्रपट

आज एका महत्वाच्या विषयावर ह्या लेख मार्फत मी बोलणार आहे.महत्वाचा विषय ह्यासाठी म्हंटले कारण आजकाल महिलांवर,मुलींवर अत्याचार होतायत तर त्या दृष्टीने हा विषय महत्वाचाच आहे.खूप दिवस एक चित्रपट प्रदर्शित होणार म्हणून सगळीकडेच चर्चा चालू होती तो म्हणजे आनंदी गोपाळ.मी सुद्धा जेव्हा ह्या चित्रपटाची झलक बघितली होती तेव्हापासून मी सुद्धा खूपच उत्सुक होते आणि ठरवलं की पहिल्याच दिवशी हा चित्रपट बघायचा.माझ्याप्रमाणे घरातील सुद्धा सर्वजण उत्सुक असल्या कारणाने आम्ही पहिल्याच दिवसाची तिकीट काढली.अखेर उत्सुकता संपली आणि तो दिवस उजाडला आणि आम्ही ठरल्याप्रमाणे चित्रपट बघण्यासाठी निघालो.घरापासून ते  चित्रपटगृह ह्या ठिकाणापर्यंतच्या त्या पाच मिनिटांच्या प्रवासात मनात विचार चालूच होते चित्रपटाबद्दल.असो तर अखेर चित्रपटगृहापाशी आम्ही पोहोचलो आणि मी तिथेच माझ्या मनातील विचारांना पूर्णविराम दिला.आणि अखेर चित्रपट सुरु झाला.चित्रपट सुरु असताना टिपण्याच्या गोष्टी म्हणजे छोट्या आनंदीबाईंचा निरागसपणा,पण त्या निरागसपणा मध्ये सुद्धा असणारी एक समजुतीची भावना,जेवढ्या आनंदीबाई निरागस,तितकेच कठोर आणि स्पष्ट बोलणारे गोपाळराव.आनंदीबाईंना आधार देणारे,त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे गोपाळराव खरंच त्यांचे कौतुक खूप करावेसे वाटते.त्या काळात सुद्धा ते किती खंबीरपणे उभे राहिले आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी.त्यांनी आनंदीबाईंकडे ह्या नजरेने कधीच नाही बघितले की,त्या स्त्री आहेत तर फक्त चूल आणि मूल इतकच काम करू शकतात तर त्याहीपलीकडे जाऊन त्यांनी आनंदीबाईंच्या शिक्षणाचा विचार केला,स्त्रीला सुद्धा शिकण्याचा अधिकार आहे,स्वावलंबी होण्याचा अधिकार आहे ह्या मतावर ते ठाम राहिले.ह्या शिक्षणाच्या प्रवासात गोपाळराव आणि आनंदीबाई ह्यांच्या आयुष्यात खूप अडथळे निर्माण झाले,खूप संकटे आली पण त्याही संकटांवर मात करत त्यांचा हा प्रवास चालूच होता.गोपाळरावांची आनंदीबाईंचे शिक्षण पूर्ण करण्यासाठीची धडपड दिसते,त्यांचे अथक प्रयत्न,आणि अगदी तसेच आनंदीबाईंचा अभ्यास करण्याचा ध्यास,त्यांच्याकडे असलेली जिद्द,त्यांची अफाट मेहनत खरंच खूप कौतुकास्पद आहे.गोपाळराव म्हणजे आनंदीबाई ह्यांच्या आयुष्यात एका पावसाळी ऋतू प्रमाणेच आले होते,जसा पाऊस झाडे-झुडपे,वृक्ष ह्यांना वेगळेच रूप देतो,सगळं वातावरण प्रसन्न करतो,अगदी तसेच गोपाळराव ह्यांच्या येण्याने आनंदीबाईंचे आयुष्य अभ्यासरूपी पावसाने बहरून गेले होते,जगण्याची एक नवी उमेद त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती.त्याकाळी जसे गोपाळराव होते अगदी तसेच गोपाळराव आजच्या जगात जन्माला येण्याची गरज आहे.आजकाल महिलांवर,मुलींवर होणारे अत्याचार पाहता,महिला सुशिक्षित आणि सर्वगुणसंपन्न असून सुद्धा फक्त हुंड्यासाठी त्यांचा होणारा छळ हे सर्व थांबण्यासाठी गोपाळराव जोशींसारख्या व्यक्तिमत्वाची खूप गरज आहे.शहरी भागात मुलींना उत्तम शिक्षण दिले जाते,परंतु ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी मुलींना शिक्षण पद्धतीपासून वंचित ठेवले जाते,त्यांची आवड जोपासली जात नाही हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे.असे खूप  काही सामाजिक विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे.ह्या चित्रपटाबद्दल अजून एक प्रमुख गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे चित्रपटाच्या शेवटी जेव्हा आनंदीबाई गोपाळराव जोशी वैद्यकीय पदवी संपादन करतात तेव्हा  गोपाळराव आणि आनंदीबाईंची भेट होते.तो क्षण खरंच अंगावर शहारा आणतो,थोड्या वेळासाठी  डोळ्यात पाणी उभं राहत तो प्रसंग पाहून.गोपाळराव डोळ्यात आनंदाश्रू आणून आनंदीबाईंकडे कौतुकाने बघत असतात.खरंच आनंदीबाई आणि गोपाळराव यांची ती भेट, ते दृश्य अजूनही नजरेत आणि मनात साठवून ठेवलय.तर असा हा आनंदीबाई आणि गोपाळराव ह्यांचा शिक्षणासाठीचा प्रवास.खरंच आनंदी गोपाळ ह्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझा मनापासून साष्टांग नमस्कार की त्यांनी इतका उत्तम विषय लोकांसमोर,समाजासमोरआणला.खूप काही शिकवण देणारा हा चित्रपट आहे.जाता जाता इतकंच सांगेन की,जे कोणी हा लेख वाचतील त्यांना माझे मनापासून अभिवादन आहे की,हा चित्रपट नक्की बघा.आपण रोज आपल्या आयुष्यात इतके व्यस्त असतो की,आपण ह्या गोष्टींचा विचार करत नाही तर हा चित्रपट बघून आपली विचारपद्धती सुद्धा बदलेल आणि ह्या बाबतीत आपण संदर्भात विचार करू.तर हा चित्रपट नक्की बघा. 🙏🙏🙏🙏🙏🙏















टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास