बालपण पुन्हा यावे असे वाटते......
आजकाल सर्वच लहान मुलांना शाळांना सुट्ट्या असल्याकारणाने ठिकठिकाणी त्यांचे आवाज कानावर पडत असतील.ती सर्वच लहान मुलं अगदी खेळण्यात मग्न झाली आहेत.सुट्टीचा अगदी भरपूर आनंद घेत आहेत.त्यादिवशी अशीच खिडकीत उभी असताना अचानक त्या मुलांवर नजर गेली.त्यांना पाहून मी अचानक लहानपणीच्या आठवणींत हरवून गेले.हे तर आपल्या सर्वांच्या बाबतीत नक्कीच होत असणार.कारण तोच एक आयुष्याचा असा टप्पा असतो जो प्रत्येकाला परत आपल्या आयुष्यात यावा असच वाटत असतं.तर हीच भावना मी काही ओळींमधून मांडण्याचा प्रयत्न करतेय.
आजकालच्या स्मार्ट फोन्सच्या जगात
लहानपणी जत्रेतील तो हट्ट करून घेतलेला फोन
अजूनही ते आठवले की चेहऱ्यावर हसू येते
बालपण पुन्हा यावे असे वाटते....
पुन्हा एकदा गल्लीत ते
लपाछुपी,लगोरी,पकडा-पकडी चे
खेळ रंगावे असे वाटते
बालपण पुन्हा यावे असे वाटते....
आजकालच्या मोठमोठ्या पार्ट्यांपेक्षा
आधीच्या त्या एक रुपयाच्या पेप्सीची
सवंगडी सोबतची पार्टी अजूनही किती सुखद वाटते
बालपण पुन्हा यावे असे वाटते....
आजकाल कामावर जाताना
त्या चार्जेर आणि लॅपटॉपच्या बॅगेच्या वजनापेक्षा
वह्या-पुस्तकांनी भरलेले दप्तराचे ओझे अजूनही आठवते
बालपण पुन्हा यावे असे वाटते....
आजकाल वाढदिवस साजरा करताना
ते आधीचे फक्त आपण नवीन कपडे
घालून शाळेत जाणे आणि सर्वांना चॉकलेट्स देणे ती आठवण डोळ्यासमोर येते
बालपण पुन्हा यावे असे वाटते....
कामाच्या ठिकाणी सरांनी केलेल्या कौतुकापेक्षा
शाळेत शिक्षकांनी उभे करून
पाठीवर दिलेली शाबासकीची थाप अजूनही आठवते
बालपण पुन्हा यावे असे वाटते....
आता स्वतःच्या गाडीवर फिरण्यापेक्षा
लहानपणी सायकलवर बाबांच्या पाठी बसून
त्यांना घट्ट मिठी मारून केलेला प्रवास ही आठवण किती हवीहवीशी वाटते
बालपण पुन्हा यावे असे वाटते....
आता आईला आधार देऊन तिचा हात हातात घेऊन चालणे त्याहीपेक्षा
लहानपणी आईने आपला हात तिच्या हातात घेऊन
तो केलेला मायेचा स्पर्श अजूनही ते सर्व आठवते
बालपण पुन्हा यावे असे वाटते....
आजकालच्या स्मार्ट फोन्सच्या जगात
लहानपणी जत्रेतील तो हट्ट करून घेतलेला फोन
अजूनही ते आठवले की चेहऱ्यावर हसू येते
बालपण पुन्हा यावे असे वाटते....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा