लॉकडाऊनचे दिवस......

 लॉकडाऊनचे दिवस......

लॉकडाऊन...... हा आता रोज कानावर पडणारा शब्द. बघावं तिकडे ह्याचीच चर्चा आहे. बातम्या, सोशल साईट्स वर सगळीकडेच. पण हे दिवस कधी एकदा संपतायत आणि कधी एकदा आधीसारख जीवन जगायला मिळतंय असं प्रत्येकाला वाटतय.
         सध्या सर्वजण कोरोना सारख्या महामारीशी लढत आहेत. प्रत्येकजण खूप कठीण काळात दिवस जगत आहेत.
ह्या दिवसांत आपल्या मनात कितीतरी प्रश्न निर्माण झाले. हे संकट कधी जाईल? आधीसारखे आयुष्य कधी जगता येईल? मनमोकळेपणाने कधी बाहेर फिरता येईल? कधी एकदा बाहेर मित्रांना भेटता येईल? बाहेर पडून कधी चमचमीत पदार्थ खाता येतील? मित्रांसोबत कधी मजा मस्ती करता येईल? असे अनेक प्रश्न सर्वांना आहेत.
         परंतु, असं हे जगणं खरंच वाईट आहे का? ह्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर हे आयुष्य सुद्धा खूप छान वाटेल. कधी तुम्हाला ह्या लॉकडाऊनच्या दिवसांबद्दल तक्रार करावीशी वाटलीच. तर त्यांचे चेहरे समोर आणा जे आपल्या कुटुंबापासून दूर अडकले आहेत. ज्यांचे रोजच्या मिळणाऱ्या मजुरीवर जीवन होते. असे कितीतरी लोक जे ह्या दिवसात बेरोजगार झाले आहेत. त्यांची व्यथा आता काय असेल? ह्याचा कधी विचार आलाय का मनात? आपल्याला राहायला घर आहे, आपण घरातून ऑफिसच काम करतोय, महिन्याचा पगारही मिळतोय, दोन वेळच जेवण मिळतंय. मग अजून काय हवयं ह्या जगण्यासाठी.
             ह्या लॉकडाऊनच्या दिवसांत ज्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सुद्धा सोय नाही होऊ शकत विचार करा ते कसे जगत असतील. घरातल्या कर्त्या पुरुषाची नोकरी गेली किंवा ज्या व्यक्तीच्या पगारावर घर चालत होत त्याचीच नोकरी गेली तर त्या लोकांवर किती वाईट वेळ येत असेल ह्याची कल्पना केली आहे का?जगण्यासाठी अखेर काय लागतं निवांत झोपता येईल असं घर, दोन वेळचं जेवण, आपल्या प्रिय व्यक्तींची सोबत. जर मनाशी ठरवलं तर आपण कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो. पण आपण आपल्याला जे मिळाल नाही त्याच गोष्टीचा जास्त विचार करतो. मग जगणं हे कठीणचं होणार ना.
             कधी कधी हा सुद्धा मनात विचार येतो की, किती वेळ असं घरात अडकून राहणार? कधी मी बाहेर पडून मोकळा श्वास घेईन? असे असंख्य विचार मनात येतात. थोडी चिडचिड होते हे साहजिकच आहे. कधी असे आपण जगलो नव्हतो मग हा विचार मनात येणारच. पण मग अशा वेळी त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा चेहरा समोर आणा, वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचा चेहरा समोर आणा. जे ह्या कठीण काळात फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या सरंक्षणासाठी बाहेर पडून आपले कर्तव्य बजावत आहेत. स्वतःच्या जिवापेक्षा आपल्या सर्वांचा विचार करत आहेत. मग आपण त्यांच्यासाठी घरी नाही राहू शकत का? सर्व नियमांचं पालन नाही करू शकत का? आपल्याला कायमस्वरूपी घरात नाही राहायचं आहे. फक्त ह्या महामारीला कायमचं संपवण्यासाठी आपल्याला ह्या नियमांचं‌‍ काटेकोरपणे पालन करायचं आहे.
शत्रूला जर कायमचं संपवायचं असेल तर माघार घेणं हे केव्हाही चांगलंच. तर हा विचार आपण प्रत्येकाने एक कर्तव्यनिष्ठ नागरीक म्हणून केला पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास