आयुष्य जगण्याची गंमत......

 आयुष्य जगण्याची गंमत......

आपण रोज आपलं आयुष्य जगत असतो. दिवस सुरु होतो तो धावपळीत, चिंता, अपेक्षा, जबाबदाऱ्या ह्या सर्वांपासून.हे सर्व काही सांभाळता सांभाळता आपण किती व्यस्त होऊन जातो ना. खरा जगण्याचा अर्थ काय? जगण्याची खरी गंमत कशात आहे? हेच आपण या सर्व जबाबदारीमुळे विसरून जातो. स्वतःच अस्तित्व कुठेतरी हरवून जातं. पण एकदा तरी स्वतःसाठी जगावं प्रत्येकाने. एक दिवस तो असा जगावा की, जसा काय तो दिवस फक्त आपलाच आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्या, दुःख चिंता सर्व काही रोज वाट्याला येतातच. पण त्यादिवशी सर्व काही विसरून तो एक दिवस स्वतःसाठी जगा. तुम्हाला आवडत असेल ती गोष्ट करा. समुद्रकिनारी डोळे मिटून निवांत बसा. त्या समुद्राच्या ठिकाणी येणारा लाटांचा आवाज, तिथे वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, तिथे बागडणाऱ्या लहान मुलांचा आवाज, तिथल्या वाऱ्याने केलेला स्पर्श अगदी हे सर्व काही मनात साठवून ठेवा. समुद्रकिनाऱ्यावर उधळलेले निसर्गाचे रंग अगदी सर्व काही तुमच्या मनात साठवून ठेवा. तिथल्या लहान मुलांना बागडताना पाहून तुमचं मन सुद्धा बालपणींच्या आठवणींमध्ये रमवा. अगदी लहान, अल्लड मुलासारखं जगावंसं वाटलं तर तस जगा. कोण काय म्हणेल हा विचार मनात आला तर हा सुद्धा विचार करा की ,आजचा दिवस परत कधी येणार नाही. ही वेळ एकदा निसटून गेली की गेली. समुद्रावर जी वाळू असते ती हातात घेतली की, सहजरीत्या निसटते अगदी तसंच ही वेळ, हा क्षण सुद्धा लगेच निसटून जाईल. मग नंतर स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा जो हा क्षण आहे तो मनसोक्तपणे जगा. प्रत्येक क्षणाची आठवण आयुष्यभर लक्षात राहील अशा रीतीने तो प्रत्येक क्षण जगा. पुस्तकाची आवड असेल तर पुस्तक वाचन करा. पुस्तक वाचन करताना त्या पुस्तकातील कथेत अगदी हरवून जा आणि ती कथा वाचा. अगदी त्या कथेशी एकरूप होऊन, त्या कथेतल्या प्रत्येक पात्राशी एकरूप होऊन वाचन करा . तेव्हा कुठे ती कथा वाचण्यात अजूनच मजा येईल. प्रत्येक पुस्तक आणि त्या पुस्तकात लिहिलेली कथा, कविता, कथेतील पात्र ही त्या लेखकाला त्याच्या आयुष्यात जे त्याला अनुभव आले आहेत त्यामधून घडलेली असतात. जर तुम्ही त्या पुस्तकाशी एकरूप झालात तरच तुम्हाला त्या पुस्तकाच्या कथेतील भाव, कवितेतील एकेक ओळीचा अर्थ उमजेल.  लेखकाचा ते पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश तुम्हाला उमजेल आणि तुम्ही सुद्धा त्या पुस्तकातून काहीतरी नवीन शिकवण घ्याल. प्रत्येक पुस्तक हे नव्याने जगायला शिकवतं. म्हणून वाचन हे गरजेचं आहे. गाणी ऐकण्याची आवड असेल तर गाणी ऐका आणि ते गाणं गुणगुणत राहा. डोळे मिटून ते गाणं ऐका आणि त्या गाण्यातल्या प्रत्येक ओळीला, शब्दाला, त्या गाण्यात दडलेल्या भावनेला तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. खरंच जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा त्याक्षणी ह्या गाण्यांना सोबती बनवा. त्या गाण्यांशी एक नातं निर्माण करा. जेवढं जमेल तेवढया मोठ्याने ते गाणं गाण्याचा प्रयत्न करा. तेव्हा त्याक्षणी तुमचं परीक्षण करायला कोणी नसेल. फक्त तुम्ही आणि तुमच्या आवडत्या गाण्यांची मैफिल सजू द्या. जसे तुम्ही आहात अगदी तसेच त्याक्षणी जगा. हा सुद्धा एक अनुभव आयुष्यात घेऊन बघा. तो अनुभव तुम्हाला आंनद, समाधान देणारा ठरू शकेल.  ह्याक्षणी काही ओळी आठवल्या.

ये जिंदगी भी कितनी अनमोल चीज हैं.

जिंदगी का हर एक पल रेत की तरह फिसलता हैं.

ये पल तेरे लिए रुकने वाला नहीं हैं.

बहते हुए पानी की तरह ये भी आगे निकल जानेवाला हैं.     

तो ये पल जी ले जब तक ये तेरे साथ हैं.

'तेरी ये जिंदगी तुझे इतनी सारी खुशिया देना चाहती हैं तो तू भी जरा तेरी झोली इन खुशियो से भर दे, गम तो हर एक के जिंदगी में होता ही हैं.

गम नहीं तो जिंदगी जिने में मजे कैसे आयेंगे, बस जिंदगी जिना उसने ही सीख लिया जो जिंदगी हर एक मोड पर मुस्कुराते हुए जी रहा हैं.

तर असच हे आयुष्य प्रत्येकाने मनसोक्तपणे जगा. आपलं आयुष्य किती आहे हे कोणी बघितलं आहे पण जोपर्यंत आहे तोपर्यंत मनमोकळेपणाने जगा. आयुष्य जेव्हा आपली साथ सोडेल तेव्हा त्याला सुद्धा आपला हेवा वाटला पाहिजे. खरंच अशा रीतीनेच प्रत्येकाने जगलं पाहिजे.

आज लिखाण करताना आनंद चित्रपटातील संवाद आठवले. त्या चित्रपटातील संवाद खरंच जगण्याची नवी उमेद देतात. त्याच चित्रपटातील एका प्रसिद्ध गाण्यातील काही ओळी आठवल्या.

जिंदगी कैसी हैं पहेली हाये.

कभी ये हंसाये, कभी ये रुलाये.

शेवटी हेच सांगणं की, आयुष्य खूप छोटं आहे. ते कसं जगायचं हे सुद्धा आपल्यावर, आपल्या विचारपद्धतीवर अवलंबून आहे. तर ते आहे तोपर्यंत आयुष्यात आलेला प्रत्येक सुखाचा, दुःखाचा क्षण जगा आणि प्रत्येक क्षणांतून जो अनुभव मिळेल त्यातून काहीतरी शिकवण घेऊन पुढे जात राहा आणि आयुष्याचा हा सुखकर प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करा.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास